Tuesday, 25 November 2008

तिफन

काया मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते,
इज थयथय नाचते, धग ढोल वाजविते
तिफन चालते

नंदी बैलाच्या जोळीले सदाशिव हकालते
वटी बांधून पोटाले पारावती उनारते
वटी पोटाले बांधते झोयी काटीले टांगते
झोयी काटीले टांगते त्यात तानुलं लळते
त्यात तानुलं लळते ढग बरसते
तिफन चालते

काकरात बीजवाई जसं हासरं चांदनं
धरतीच्या आंगोपांगी लाळानौसाचं गोंदनं
सरीवर सरी येती माती न्हातीधुती होते
तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते
भूल जीवाले पाळते वाट सांजीले पाह्यते
मैना वाटुली पाह्यते राघू तिफन हानते
राघू तिफन हानते ढग बरसते
तिफन चालते

वला टाकती तिफन शीतू वखर पाह्यते
पानी भिजलं ढेकुल लोनी पायाले वाटते
काया ढेकलात डोया हिरवं सपन पाह्यते
डोया सपन पाह्यते काटा पायात रुतते
काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिरवं सपन फूलते
हिरवं सपन फूलते ढग बरसते
तिफन चालते

- विठ् वाघ

1 comment:

Shilpa said...

Beautiful poem! Mala path hoti( coz it's a movie song...:P)