Wednesday, 19 November 2008

प्रेम

पुरे झाले चंद्रसूर्य
पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द आणिक
यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण
इंद्रधनू बांधील काय?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी
आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो
जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या
भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेलं

शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफान सगळं
काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं

- कुसुमाग्रज

संदर्भ :- अकरावी मधे संस्कृत शिकवणारं कॉलेज मधे कोणी नसल्याने ऐच्छिक विषय म्हणुन मराठी घ्यावं लागलं त्याचा एकमेव फायदा म्हणजे ही कविता. पण एकदम चाबुक आहे ही, हो ना? "प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं " वाह वा, hats off to कुसुमाग्रज!

No comments: