Wednesday, 19 November 2008

फुलराणी

हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती
गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत
प्रणयचंचला त्या भ्रूलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला
आईच्या मांडीवर झोके घ्यावे गावी गाणी
याहुनी ठावे काय तियेला साध्या भोळ्या फुलराणीला

पूरा विनोदी संध्यावात डोल डोलवी हिरवे शेत
तोच एकदा हासत आला चुंबुन म्हणे फुलराणीला
छानी माझी सोनुकली ती कुणाकडे पाहत होती
कोण बरे त्या संध्येतुन हळूच पाहते डोकावून
तो रवीकर का गोजिरवाणा आवडला आमुच्या राणींना
लाजलाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी

स्वर्भुमीचा जुळवीत हात नाच नाचतो प्रभातवात
खेळुनी दमल्या त्या ग्रहमाला हळू लागती लपावयाला
आकाशीची गंभीर शांती मंद मंद ये अवनीवरती
विरु लागले संशय-जाल संपत ये विरहाचा काल
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनी हर्ष निर्भरा नटली अवनी
स्वप्न संगमी रंगत होती तरीही अजुनी फुलराणी ती

तेजोमय नव मंडप केला लक्ख पांढरा दहा दिशाला
जिकडे तिकडे उधळीत मोती दिव्य वर्हाडी गगनी येती
लाल सुवर्णी झगे घालुनी हासत हासत आले कोणी
कुणी बांधिला गुलाबी फेटा झकमकणारा सुंदर मोठा
आकाशी चंडोल चालला हा वाड़निश्चय करावयाला
हे
थाटाचे लग्न कुणाचे साध्या भोळ्या फुलराणीचे

गावू लागले मंगल पाठ सृष्टीचे गाणारे भाट
वाजवी सनई मारुतराणा कोकीळ घे तानावर ताना
नाचू लागले भारद्वाज वाजविती निर्झर पखवाज
नवरदेव सोनेरी रवीकर नवरी ही फुलराणी सुंदर
लग्न लागले सावध सारे सावध पक्षी सावध वारे
दवमय हा अंतःपाट फ़िटला भेटे रवीकर फ़ुलराणीला

- बालकवी (त्र्यं बा ठोंबरे)

संदर्भ :- दहावी च्या पुस्तका मधली ही नितांतसुंदर कविता (तसं आमच्या course चं सगळच content झक्कास होतं अगदी). सहसा कुठल्याच कविता पाठ व्हायच्या नाही, पण ही मात्र सहज डोक्यात, मनात, हृदयात जी जाउन बसली ती कायमची. अजुनही एखादं कडवं सहज तोंडावर येतं. ही कविता शिकवणारया ठोंबरे मॅड्म ना शतशः धन्यवाद. दुसरया कडव्यातील "चुंबुन" च्या वेळेचं अक्ख्या वर्गा मधलं टेंशन अजुनही विशेष आठवतं.


No comments: