Thursday, 13 November 2008

अनाम वीरा

अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त,
स्तंभ तिथे ना कोणी बांधला, पेटली ना वात!

धगधगता समराच्या ज्वाला या देशा काशी
जळावयास्तव संसारातुनी उठोनिया जाशी!

मुकपणाने तमी लोपती संध्येच्या रेशा
मरणामधे विलीन होशी ना भय ना आशा!

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझे बलिदान !

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !

- कुसुमाग्रज

संदर्भ :- 'सा रे ग म प Little Champs' मधल्या आर्या आंबेकर नी हे गाणं त्यादिवशी सादर केलं अन तेव्हापासून playlist वरुन हलायला तयारच नाही. कुसुमाग्रजांच्या सगळ्याच कविता तशा भन्नाट, पण ही ख़रच वेड लावणारी आहे.

No comments: